⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | रमजान महिना विशेष : अज्वा खजूर दोन हजार रुपये किलो

रमजान महिना विशेष : अज्वा खजूर दोन हजार रुपये किलो

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला रविवारपासून प्रारंभ झाला. रमजानमधील उपवास म्हणजेच रोजा सोडण्यासाठी खजुराचा वापर होतो. यामुळे सध्या बाजारात विविध प्रकार व जातींच्या खजुरांची विक्री वाढली आहे. ग्राहकांना आवडीनुसार खरेदी करता यावी, यासाठी शहरात ४० टन खजुराची आवक झाली आहे. शहरातील प्रमुख सहा विक्रेते व रिटेल २५ ते ३० विक्रेत्यांकडून या खजुराची विक्री केली जाते. गतवर्षाच्या तुलनेत यंदा दर मात्र सरासरी १० ते १५ टक्के वाढले आहेत.


रमजानच्या पहिल्या दिवसापासूनच मुस्लिमबहुल भाग असलेल्या जाम मोहल्ला, अमरदीप चौक, रजा टॉवर, मोहंमद अली मार्ग आदी भागात गर्दी वाढली आहे. रमजानचे उपवास सोडण्यासाठी विविध खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. खाद्य पदार्थांशिवाय अत्तर, टोपी, सुरमा तसेच इबादतसाठी आवश्यक साहित्याची मागणी आहे. ईदच्या खरेदीला अद्याप वेळ असला तरी सध्या उपवासासाठी खजुराला सर्वाधिक मागणी आहे. कारण गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व जण रोजा इफ्तार खजूर खाऊनच करतात. भुसावळच्या बाजारात अज्वा ही सर्वांत महागडी २ हजार रुपये किलोची खजूर उपलब्ध आहे. यासोबतच बरारी ११० रुपये, रसगुल्ला ३६०, किमिया १३०, मरियम २००, इराणी १२०, ओमानी २००, साधी खजूर ८०, मुस्तकिन २००, कच्ची पक्की ३२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे खजूर उपलब्ध आहे.


गेल्या दोन वर्षांपासून रमजान महिन्यात कोरोनाचा कहर होता. यामुळे विक्रेत्यांना पालिका शाळेतील इमारतीमध्ये विक्रीसाठी दुकाने लावण्यास परवानगी दिली होती. यंदा मात्र निर्बंध नसल्याने जाम मोहल्ला व अमरदीप चौकात रोजा इप्तारीच्या वेळी खरेदीसाठी गर्दी वाढती आहे. यंदा रमजान पर्व मोकळेपणाने साजरे होत आहे. त्यात गरजेच्या वस्तू खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद आहे. यामुळे दीर्घकाळानंतर रमजानपर्वात उलाढाल देखील वाढली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह