जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अंदामान बेटांवर असानी चक्रीवादळ दाखल झालं आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातही दिसून येईल. महाराष्ट्रावरील ढग गडद झाले असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नसली तरी पुढील ३ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून यामुळे तापमानाचा पारा देखील काही अंश कमी राहील. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लागली होती. त्यामुळे तापमानाच्या पारा कमी झाला होता. मात्र त्यानंतर ही स्थिती निवळल्यानंतर तापमानात वाढ झाली हाेती. यंदा मार्चच्या पंधरवडा पासूनच राज्यासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. यामुळे सकाळपासून उन्हाचा उकाडा जाणवत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे जळगावातील ४२ अंशांपुढे गेलेले तापमान साेमवारी पुन्हा चाळिशीपर्यंत खाली आले.पुढील तीन दिवस जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहणार आहे.
…तर गहू, मका मातीमाेल
गेल्या दहा वर्षांपासून मार्च महिन्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यात केळी,रब्बीच्या पिकांचे नुकसान हाेते. मार्च महिन्यात कापणीला आलेला गहू, मका आणि कांद्याच्या बियाण्याचे माेठे नुकसान हाेते. वादळामुळे मका आणि केळीसह फळबागांचे माेठे नुकसान हाेत आहे. आता या आठवड्यात पुन्हा अवकाळीचे ढग घाेंगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रब्बीचे नुकसान हाेण्याची भीती आहे.