⁠ 
शनिवार, मे 18, 2024

खोटा करारनामा भोवला ! बीएचआर संस्थापक प्रमोद रायसोनीला सश्रम कारावासाची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२२ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चाळीसगाव शहरातील शाखेचे कार्यालय असलेले चार गाळे स्वत:च्या नावावर नसतानाही खोटा करारनामा तयार करून या गाळ्यांपोटी २५ लाख रुपये डिपॉझिट व दरमहा पाच हजार रुपये उकळल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाचा शनिवारी निकाल लागला. यात बीएचआरचा संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ६१, रा. बळीरामपेठ) याला साडेतीन वर्षे सश्रम कारावास व २५ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास २१ महिन्यांची साधी कैद तर तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुकलाल शहादू माळी (वय ५२, रा. तळेगाव, ता. जामनेर) याला साडेतीन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बीएचआरचे चाळीसगाव शहरात मेजर कॉर्नर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील चार गाळ्यांमध्ये शाखा आहे. ही दुकाने स्वत:च्या नावावर नसताना प्रमोद रायसोनी व त्याची पत्नी कल्पना यांनी ८ फेब्रुवारी २००६ रोजी मुख्य व्यवस्थापक माळी याच्या मदतीने खोटे करारनामे तयार केले. गाळे आपल्याच नावावर असल्याचे या कारारनाम्यात नमूद केले. यानंतर या गाळ्यांचे डिपॉझिट म्हणून २५ लाख रुपये घेतले. गाळ्यांच्या मेंटेनन्सपोटी दरमहा पाच हजार रुपये घेतले. दरम्यान, २७ ऑक्टोबर २०१५ रोजी पतसंस्था अवसायनात गेली. तर ७ नोव्हेंबर २०१५ रोजी जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले. यानंतर संस्थेच्या शाखा, डिपॉझिट, व्यवहार, डेडस्टॉक, आर्थिक व्यवहार तपासण्यात आले. यात चाळीसगाव शहरातील या चार गाळ्यांचे करारनामे खोटे असल्याचे आढळून आले. हे गाळे सुनीता जगन्नाथ वाणी यांच्याकडून कल्पना रायसोनी यांनी १४ जून २००६ रोजी ८ लाख २५ हजार रुपयात खरेदी केल्याचे आढळून आले. तर संस्थेत हेच गाळे प्रमोद रायसोनीच्या नावे असल्याचे दाखवून पैसे काढून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे रायसोनी दाम्पत्य व माळी यांनी संगनमत करून पतसंस्थेचे सभासद, ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते.

यानंतर लिपिक सुनील गोपीचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध ८ डिसेंबर २०१६ रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप सादर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी विनय मुगळीकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. युक्तिवादाअंती न्यायालयाने प्रमोद रायसोनी व सुकलाल माळी यांना दोषी धरून शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ऍड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी राजेश भावसार यांनी सहकार्य केलेे.

प्रमोद रायसोनी हा बीएचआर घोटाळ्यातील विविध प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यात आधीच कारागृहात असून आता त्याला खोटा करारनामा प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.