जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यावर गेल्या आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे तापमानाचा पारा घसरला होता. मात्र आता अवकाळी पावसानंतर वातावरण निवळले असून तापमानात वाढ हाेत आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून हाेळीपर्यंत तापमान तब्बल ४४ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ७ मार्चला ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. जिल्ह्यात दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमान ३४ वरून २० अंशांवर आल्याने गारठा वाढला होता. मात्र, गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पावसानंतर वातावरण निवळले असून तापमानात वाढ होत आहे.
जिल्ह्यात कमाल तापमानात सतत वाढ हाेत आहे. शनिवारी ३७.१ अंश तापमान नाेंदविले गेले. साेमवारपासून त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता असून येत्या शुक्रवारपर्यंत पारा चाळीशी पार करून तब्बल ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आठवडाभर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. आठवड्यानंतर २ अंशानी तापमान कमी हाेवून ४० ते ४२ अंशादरम्यान असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.