जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या एरंडोल तालुक्यातील जवखेडेसीम येथील ३६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. अनिल साहेबराव पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
अनिल पाटील यांची ४ एकर शेती आहे. सोसायटी व खासगी हात उसनवारीचे त्यांच्यावर कर्ज होते. यावर्षी अनिल पाटील यांनी कापसाची लागवड केली होती, मात्र अतिवृष्टीमुळे कापसासह अन्य पिकांचे अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. सकाळी ते घरात दिसले नाही म्हणून वडील साहेबराव पाटील यांनी गावातील नातेवाईकांना ही माहिती दिली.
रवींद्र पाटील, शालिक पाटील यांनी शोध घेतला असता शेतातील विहिरीजवळ त्यांचे कपडे आढळले व त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली व १ मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.