जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । रोजगार हमी योजनेंर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अनुदान देताना दोन विहिरी मधील अंतराची अट 150 मीटर वरून 50 मीटर करावी तसेच सेमीक्रिटीकल क्षेत्र (डार्क झोन) सुरु असलेल्या अमळनेर तालुक्यासह इतर तालुक्यातील विहिरींना विशेष बाब म्हणून मंजूरी मिळावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत केली.
रोजगार हमी योजना मंत्री ना संदीपान भूमरा यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार रोजगार हमी योजना विभाग, अशोक शिरसे मंत्री यांचे खाजगी सचिव, संजना खोपडे उपसचिव रोजगार हमी योजना विभाग मंत्रालय, शांतनु गोयल आयुक्त नरेगा नागपुर, विजय कुमार कलवले सहाय्यक संचालक, रोजगार हमी योजना विभाग मंत्रालय, प्रवीण सुतार राज्य MIS समन्वयक रोजगार हमी योजना विभाग मंत्रालय मुंबई आदी अधिकारी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अनुदान देताना दोन विहिरी मधील अंतराची अट 150 मीटर असल्याने ती अट 50 मीटर पर्यंत करण्यात यावी, तसेच अमळनेर तालुक्यासह पारोळा, पाचोरा, चाळीसगाव यासह इतर तालुके हे सेमी क्रिटिकल क्षेत्रात (डार्क झोन ) मध्ये येतात मात्र, गेल्या चार वर्षात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे या क्षेत्रात असलेल्या विहिरींना विशेष बाब म्हणून मंजूर देऊन हे तालुके डार्क झोन मधून वगळण्यात यावे अशी मागणी केली.
या संदर्भात मंत्री ना संदीपान भूमरा यांनी सकारात्म प्रतिसाद देऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश अधिकारी वर्गास दिल्याने लवकरच येणाऱ्या काळात सदर संदर्भात शासन निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.