⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

Breaking : घड्याळात कॅमेरा लावत जळगावच्या तेजस मोरेने केले ‘ते’ स्टींग : प्रवीण चव्हाण यांचा आरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या गौप्यस्फोटच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. या क्लीपबाबत नुकतेच ऍड.प्रवीण चव्हाण यांनी मोठा आरोप केला आहे. जळगाव येथील तेजस मोरे या तरूणाने भेट म्हणून दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेर्‍यातून आपले स्टींग करण्यात आल्याचा आरोप विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. तसेच यातील व्हिडीओ मॉर्फ करून बदलण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. व्हिडीओ बॉम्बप्रकरणी जळगावचे कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट करत सव्वाशे तासांचे स्टींग ऑपरेशन सादर करून खळबळ उडवून दिली होती. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात असलेल्या कॅमेऱ्याने केलेले हे चित्रीकरण असल्याने अनेकांची नावे समोर आली होती. यावर प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ आपल्यांवरील आरोप खारीज केले होते. यानंतर प्रवीण चव्हाण यांनी एबीपी-माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे स्टींग नेमके कसे झाले याची माहिती दिली.

प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या पुणे येथील कार्यालयात तेजस मोरे या तरूणाने आपल्याला एक घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ आपण कार्यालयात लावले होते. यातील छुप्या कॅमेर्‍यातून आपले स्टींग करण्यात आले. मात्र यात आपण कुणाचेही नाव घेतलेलेच नाही. तर हे व्हिडीओज एडीट करण्यात आलेले आहे. यात माझ्या तोंडी नसणारी वाक्ये यात टाकण्यात आलेली आहेत.

या संदर्भात प्रवीण चव्हाण म्हणाले की, माझ्या चित्रीकरणात नसलेला आवाज यात टाकण्यात आलेला आहे. यामुळे हे व्हिडीओ पूर्णपणे एडिट करून तयार करण्यात आलेले आहेत. हे घड्याळ आपल्याला भेट म्हणून देणारा व्यक्ती तेजस मोरे असून तो जळगाव येथील असल्याची माहिती देखील प्रवीण चव्हाण यांनी याप्रसंगी दिली. तर या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तेजस मोरे हा एका जामीनाच्या संदर्भात आपल्याकडे आला होता. त्याने आपल्याला विविध वस्तू देण्याचे सुचविले होते. यानंतर त्याने आपल्याला घड्याळ भेट दिले आणि ते अखेर आपण ऑफीसच्या भिंतीवर लावले. यातूनच आपले चित्रीकरण करून यातील व्हिडीओ एडीट करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान, तो जळगावचा असल्याने या प्रकरणात जळगावचे कनेक्शन असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर तेजस मोरे याच्या सोबत चाचू नावाची व्यक्ती होता अशी माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली. दरम्यान, प्रवीण चव्हाण यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.