जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । जिल्ह्यातील वाढते गुन्हे लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील संपूर्ण २९ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. यात ४०६ ग्राम सुरक्षा सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
याबाबत निंभोरा पोलिस स्टेशन येथे १० रोजी पोलिस पाटील व ग्रामसुरक्षा पथकाच्या सदस्यांची बैठक झाली. त्यात गावात गस्त घालणे, छोट्या मोठ्या चोऱ्या, शेतमालाच्या चोऱ्या थांबविण्याकरिता रात्री गस्त घालणे यांसह सण उत्सव, अपघाताचे वेळी पोलिसांना मदत करणे या बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
सदस्यांना कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर, निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, डिगंबर चौधरी तंतमुक्ती समिती अध्यक्ष, प्रल्हाद बोंडे यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील यांच्यासह ग्राम सुरक्षा पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम सुरक्षा पथक स्थापन करणे कामी पोलिस नाईक स्वप्नील पाटील, होमगार्ड अमोल अंजनसोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.