कायमची पक्की आयुष्यभराची जोडीदार…
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । ती एकत्र कुटुंबाच्या सावलीत वाढलेली , वडिलांची दर दोन तीन वर्षांत होणारी बदली त्यामुळे नवीन लोकांमध्ये सहज मिसळणारी अशी ती , सर्वांनी मिळून राहायचं , तुझं माझं असे काहीही तिच्या मनात नव्हतं आणि माहित नाही असं काय पाहिलं होतं तिने माझ्यात की.. घरातून कायम नाकारल्या गेलेल्या पण स्वताच्या हिंमतीने कायम आनंदाच्या सागरात पोहणारा मी.. खुप पुढचा कधीही विचारही न करणार्या माझ्या जीवनात तिनं कायमचं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ती 18 व मी 21..
सुरुवातीला ती जशी तिच्या घरी राहायची तशीच बिनधास्त इकडेही राहणारी. बाहेरच्या जगाचा अनुभव शून्य व सर्वांनाच आपलं मानने हा तिचा मूळ स्वभाव . तिच्या स्वप्नातलं ते एकत्रित कुटुंबाचं घर खुप प्रयत्न करूनही आम्ही आठ वर्षांपर्यंत बांधून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यासाठी काय करता येईल ते केले अगदी वयाच्या 21 व्या वर्षांपासूनच राहत्या घराच्या होम लोनपासून सर्व खर्चाची जबाबदारी आम्ही पेलत होतो व तीची साथ प्रत्त्येक क्षणी होती. तिचं मला कौतुक वाटतं कारण ‘बारावी पास’ मी माझ्या व्यवसायात “स्व बळावर” उभा राहत असताना ती प्रत्त्येक वेळी खांद्याला खांदा लावून कायम सोबत.. दिवस रात्र मेहनतीने कितीतरी पैसा कमवत होतो पण एकदाही तिच्या मनात ‘हा आपला पैसा आहे आणि तो आपल्याच साठी ठेवायचा’ असे एकदाही तिच्या मनात आलं नव्हते तर लवकरात लवकर सर्व लोन निल करायचं आणि पुढचं पाऊल उचलायचे हेच हिचं चालू..
आई वडीलांकडे पाण्याचा ग्लासही न घेणारी माझ्यासाठी ते सर्व ऐशोआरामाचे जीवन सोडून इथे घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित शिकलीच नाही तर गेल्या 20 वर्षांपासून सगळी कामे अगदी आनंदाने करते.. आमच्याकडे घरातल्या कुठल्याही कामाला अजूनही बाई नाही तर मला हाताशी घेऊन पटापट कामे उरकवून सोबतीने सकाळीच 8 वाजता आॅफीसला पोहचणारे आम्ही खरचं Antique नमुनेच.. रात्री 11.30 – 12.30 ही व्हायचे दिवसभर sales and servicing मुळे कितीतरी बोलायचचं काम तरी घरी जाऊन पटकन मॅगी किंवा पोहे , उपमा बनवणारी तीचं… पण चेहर्यावर कधीच थकवा वा संताप नाहीच तर तो थकवाही एंजॉय करणारी ती खरंच वेडीच.. खरंतर प्रेमवेडी..
स्वत:चं शिक्षण, कला, एखाद्या विषयातलं नैपुण्य हे केवळ घरचं कोण बघणार ह्या प्रश्नाखाली चिरडलं जाणही योग्य नाही. स्त्रीने संसारासाठी असं करणं अपेक्षित असतं. बहुतांशी स्त्रीच्याच्या वाट्याला हा सो कॉल्ड “त्याग” येतो. तिच्यातले अंगभूत नैसर्गिक गूण, त्यावर लग्नाआधी तिने घेतलेली मेहनत ओळखून त्याअनुसार तिच्यासाठी संसारात जागा निर्माण करणं, तिला वाव देणं मला महत्त्वाचे वाटत होते. जोडीदार म्हणून हे प्रोत्साहन, पाठबळ मिळाल्यावर करियर आणि संसार दोन्हीकडे यशस्वी होणारी स्त्री मी स्वता पाहीली आहे. तिला शिक्षणाची आवड होती यासाठी तिला प्रोत्साहन देवून तिला हवं ते शिकू द्यायचं हे मी पक्क केलं होतं.. पण शिकतांनाही तिने मला, मुलाला, घर ,आॅफीस यालाच आधी प्राधान्य दिले हे मी जाणून होतो.
मैत्रीणींच्या गराड्यात हिला कुणीच पाहीलेले नसेल हा काॅलनीत गणपतीत , नवरात्रीत तेवढं एंजॉय करून परत आपण भलं आणि आपलं काम अशी एकमेव कदाचित माझीच बायको असावी काय सांगावे… जिथे मी असेल तिथेच ही असणार नाहीतर ती आणि तिचे घर व तिची पुस्तकं… बायका कायम इतरांबद्दलच का गप्पा करतात रे , स्वताबद्दल बोलावं , मनमोकळेपणाने शेअरींग का करत नाही बरं केलीच तर त्यावर नंतर गाॅसिपिंग करतात हे तिला न आवडणारे.. म त्या अशा कशा वागतात हेही मलाच विचारून माझेच डोकं खाणार.. अशी काहीशी माझी आयुष्याची जोडीदार..
बरेच वर्ष अतोनात प्रयत्न करूनही काही जवळच्या व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक स्वभावामुळे नाही जवळ आल्या तर हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यासाठी व इतरांना बदलवण्यापेक्षा स्वतात योग्य ते बदल करून जगणं तिने निवडलं . म्हणजे स्वताच्या कुटुंबासाठी ( मी , ती व मुलगा ) Psychology , Philosophy चा फक्त आवड म्हणून Masters degree त्याही Gold medal सह शिकून शांतपणे कसं जगायचं याला महत्त्व देणारी ती.. मला कशी सांभाळते आता आलं का तुमच्या लक्षात.. माझ्यासारख्याला समजून घेवून योग्य प्रवाहात कायम वाहत ठेवणारी ती…
जे झाले ते चांगल्याचसाठी यावर ठाम असणारी व आतून शांत राहावं सांगणारी माझ्यासारख्या उथळ , कायम गोंधळ घालणार्या, हसत खेळत जगण्यावर भर देणार्याची ही अशी बायको… म थोडंसं वाटतं खरचं जोड्या आधीच ठरलेल्या असतात नै का…
आपल्यावर आपल्यापेक्षाही जास्त… जिवापाड प्रेम करणारी ती नेमकी आपलीच बायको असणं.. अजून काय पाहिजे !! अशीच कायम प्रेयसीरुपी मैत्रीण बायको आहे कारण मीही तिचा कायमचा आयुष्यभराचा सख्खा सखा बनलोय ना.. भातुकलीच्या खेळासारखा संसार आहे आमचा पण सख्य पक्के आहे..
हा प्रवास इतका सोपा नव्हता तो तु सहज केलास फक्त खट्टी मिठ्ठी साथ देवून.. बोलू देवू बोलणार्यांना आपण मस्तीत पण शिस्तीत जगू, जळू दे जळणार्यांना तेही कुठेतरी जीवचं लावतात ना आपल्याला…
इमोशनल झालेला तिचाच नवरोबा…
(संध्याचा किशोर तथा किशोर पाटील, डीजे शिवा, जळगाव)
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group