जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम जगभरात दिसून येत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, भारतात इंधन दर गेल्या १२० दिवसापासून स्थिर आहे. मात्र, पुढील आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरात २५ रुपयाची वाढ होऊन ते प्रति लिटर १३५ रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल १११ डॉलरची पातळी ओलांडली आहे. कच्च्या तेलाच्या किमती आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. मात्र कच्चे तेल महाग होऊन देखील भारतात इंधनाच्या दरात गेल्या चार महिन्यांपासून कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. याचा मोठा फटका हा इंधन कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पुढील येत्या काळात पेट्रोल आणि डिझेल २५ रुपयांनी महागणार असल्याचा अंदाज आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर भाववाढ
ब्रोकरेज कंपनी जे. पी. मॉर्गन या कंपनीच्या रिपोर्टनुसार पुढील आठवड्यात पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल आहे. या निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले जाऊ शकतात. उत्तरप्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या सात मार्चला आहे. त्यानंतर पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या दहा मार्चला जाहीर होणार आहेत.
दरम्यान, आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर –
– दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
– मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर