⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली खान्देशाची भूमी, जाणून घ्या इतिहास..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली खान्देशाची भूमी, जाणून घ्या इतिहास..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी कानांवर पडलं तर रक्त सळसळत, महाराजांचा इतिहास, शौर्य माहिती नसेल असे मोजकेच चेहरे सापडतील परंतु महाराजांची कारकीर्द अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रोज जरी बोललो तरी देखील प्रत्येकाला आवडेल. जळगाव जिल्ह्याच्या आसपास किल्ले, गड फारसे नसल्याने आपल्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा वास नसावा असे आपल्या वाटते परंतु छत्रपतींच्या पदस्पर्शाने जळगावची भूमी देखील पावन झाली आहे. आज म्हणजेच १९ फेब्रुवारी. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यापासून ४० मैल अंतरावर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तारखेप्रमाणे) आजच. याच निमित्ताने आज आपण इतिहासातील पण जळगाव आणि खान्देशाशी निगडित काही आठवणी मांडणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा खान्देशशी प्रथम संबंध आला तो आग्रा भेटीला जाताना… महाराज ५ मार्च १६६६ (फाल्गुन शुद्ध ९ शके १५८८) रोजी राजगडावरून संभाजीराजेंना बरोबर घेऊन निवडक चार-पाचशे सैनिकांसह औरंगाबादमार्गे खान्देशातून बऱ्हाणपूरला पोहोचले. प्रवास खर्चासाठी बादशहाने राजांना एक लाख रुपये बऱ्हाणपूरच्या शाही खजिन्यातून देण्याचे आदेश दिले. मुघल शहाजाद्यांची बडदास्त ठेवण्यात येते तशीच वाटेत शिवाजी महारांची बडदास्त ठेवावी असे सरपत्र बादशहाने प्रांतिक अंमलदारांना पाठविले होते. प्रवासात गाजीबेग नावाचा आपला अधिकारी महाराजांच्या तैनातीस दिला.” आग्रा येथून निसटून महाराज राजगडावर परत जाताना ते कोणत्या मार्गाने आलेत याबाबत इतिहासकारांचे एकमत नाही. एक संभाव्य मार्ग रियासतकार सरदेसाईंनी दिलेला आहे. तथापि दुसरा मार्ग आग्रा-मथुरा-धोलपूर-नखर-सीहोर-भोपाळ-हंडिआ-ब-हाणपूर-राजगड असाही संभवतो.

महाराजांचा खान्देश प्रांताशी प्रादेशिक विस्तार विषयक संबंध १६७० मध्ये आला. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये मुघलांविरुद्ध चढाई का सुरू केली असावी, यासंबंधी अलीकडेच हैदराबाद राज्य पुराभिलेखागारात मिळालेल्या पर्शिअन कागदपत्रांवरून नव्याने माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीप्रमाणे औरंगजेबाने १६७० च्या सुमारास शिवाजी महाराजांच्या राज्यावर आक्रमक हल्ले चढविण्याची योजना आखली होती. या योजनेची कुणकुण लागल्यामुळे राजांनी मुघलांच्या आधीच आक्रमणाला प्रारंभ केला आणि पुरंदरच्या तहात गमावलेला मुलूख परत घेण्याचा सपाटा सुरू केला.

“फेब्रुवारी १६७० मध्ये राजांनी बऱ्हाणपुराजवळील बहादरपुरा शहरावर चढाई करून तेथून बरीच संपत्ती हस्तगत केली. बहादरपुरा बरेच सुसंपन्न असल्याची इतिहासात नोंद आढळते. विद्यमान काळात हे मध्यम प्रतीचे गाव आहे. मात्र बऱ्हाणपुरात त्यांचा छापा यशस्वी झाला नाही. खानदेशचा दिवाण आश्रफखान याने बादशहाला लिहून कळविले की, शिवाजीची फौज वहाड प्रांत लुटीत आहे व बादशाही प्रांतातून शिवाजीने २० लाख रक्कम गोळा केली. महाराजांना बऱ्हाणपूरवर चढाई करणे शक्य न होण्याचे कारण असे की, जसवंतसिंगाच्या सेनेने त्यांना रोखले. प्रतापराव गुजराने खानदेशात शिरून बहादरपुरा शहर लुटले. नंतर चन्हऱ्हाडातील धनाढ्य कारंजा गावावर तो एकदम चालून आला. या ठिकाणी मोठमोठ्या वाड्यांतून अपरंपार संपत्ती पुरलेली होती, ती खणून काढून प्रतापरावाने पूर्णपणे हस्तगत केली.

मुघलांना पराजित करीत महाराजांची खान्देशावर सत्ता

शिवाजी महाराजांची चढाई पाहून औरंगजेबाने जसवंत सिंगाला परत बोलावून महाबतखान नामक नामांकित व अनुभवी सरदारास दक्षिणेत पाठवून सर्व फीजेचा अखत्यार त्याला दिला. माळव्याहून दिलिरखान व गुजरातमधून बहादुरखानास महाबतखानाची साथ करण्याचा निकडीचा हुकूम औरंगजेबाने पाठविला. याप्रमाणे १६७१ च्या आरंभापासून दीड वर्ष पावेतो मोठमोठे मुघल सरदार व प्रचंड फौजा शिवाजी महाराजांवर लोटल्या असतानाही, त्यांनी शौर्याने सामना केला आणि मुघलांना हरवून खान्देश, बागलाण, वऱ्हाड इत्यादी समृध्द प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे शिवाजी महाराजांचे शौर्य व धाडसाबाबत बादशहाची खात्री पटली.

पहा व्हिडिओ वृत्त :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/929560344394035
author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.