जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । राज्यात सध्या वीजबिलांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महावितरण मोठ्या तोट्यात आहे, त्यामुळे वीजबिलं भरा असे आवाहन ऊर्जामंत्र्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्याची बिलं थकली आहेत त्यांची वीज कनेक्शन कापण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं ऐन हंगामात मोठं नुकसान होत आहे. आता यावरून भाजपचे नेते आ. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाविकास आघाडी सरकरवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर अशी खरमरीत टीका गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
जामनेरात गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीच्या विरोधात भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलत होते.
राज्यात एकीकडे परीक्षेचा गोंधळ, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे भ्रष्टाचार सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याची हौस करून घेतली मात्र एक दिवस मंत्रालयाची पायरी मुख्यमंत्र्यांनी चढले नाही. आदित्य ठाकरे यांनी साहेब आता मैदानात उतरले असल्याचे म्हंटले आहे. मग दोन वर्षा मुख्यमंत्री कुठे होते? असा सवाल उपस्थित करत दोन वर्षात या राज्याचा वाटोळ झाल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. ह्या सरकारचे डोकं ठिकाणावर नसल्याची टीका ही गिरीश महाजन यांनी केली आहे.
बोदवडच्या निवडणुकीत आम्ही कोणाशीही युती केलेली नव्हती. फक्त प्रचारादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी माझी भेट झाली, आम्ही चहा घेतला म्हणजे युती होती, असं होत नाही. याची युती होती, त्याची युती होती, असं करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे, असा टोला गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला.
आता तर बोदवड पण तुमच्या हातून गेलं. तुम्ही भाजपची काळजी करू नका. तुमचंच बघा ना, रडीचा डाव खेळू नका. तुम्ही तुमची राष्ट्रवादी जिवंत ठेवा, भाजपची काळजी करू नका, असा चिमटाही महाजनांनी काढला.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?