जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी २९ चारचाकी आणि ७० दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सायंकाळी १७:३० वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलिस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लाख, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात आयोजीत करण्यात आलेला आहे. पोलिस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे.