जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । शहरातील शनीपेठ भागातील रहिवासी असलेल्या रोहित पंडीत निंदाने वय-२१ याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातून अटक केली आहे. अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत जळगाव येथील म्होरक्या रोहित पंडीत निंदाने याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे दोघे साथीदार सैय्यद रोशन सैय्यद कादीर (३५) आणि सैय्यद आझा उर्फ बब्बू सैय्यद कादीर (४३) दोघे रा.नांदुरा-बुलढाणा यांची नावे पुढे आली. चोरट्याने जळगाव शहरातून चोरलेल्या ९ दुचाकी देखील काढून दिल्या आहेत.
तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकुण १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मुद्देमालात जळगाव जिल्ह्यातील नऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन दुचाकी असल्याचे म्हटले जात आहे.एकुण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला एलसीबीचे पो.नि.शैलेश सपकाळ व त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्वीन मिश्रा, किशोर सोनोने, वसीम शेख, शक्ती कांबळे, अक्षय बोबडे, अनिल राठोड, प्रवीण कश्यप आदींनी हस्तगत केला आहे.
जळगाव शहरात राहून रात्रीच्या वेळी दुचाकी चोरायच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीने त्याची बाहेरगावी विल्हेवाट लावायची असा त्याचा फंडा होता. जळगाव शहरातील काही खबरी त्याला दुचाकीबाबत माहिती देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अकोला पोलिसांकडून तिघांना जळगाव पोलीस ताब्यात घेणार असून त्यांच्याकडून आणखी २०-३० दुचाकी भेटण्याची शक्यता आहे. जळगावात झालेल्या दुचाकी चोरीच्या अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिघे कैद झाले आहेत.