जळगाव शहर

माहिती मागणाऱ्या सदस्यालाच केले “रिमूव” ; तहसीलदारांची रेशन दुकानदारांशी मिलीभगत?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शहरी दक्षता समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा प्रशांत नाईक यांचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । गोरगरीब जनतेसाठी रेशन दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पालक मंत्री यांच्या शिफारशीनुसार तथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शहरी दक्षता समितीची नियुक्ती झाली होती. मात्र समिती निष्क्रिय ठरली असून त्याविषयी जाब विचारणारे तसेच विविध माहिती मागणारे दक्षता समिती सदस्य तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांना समितीच्या व्हाट्स अप ग्रुप मधून चक्क तहसीलदारांनीच ‘रिमूव्ह’ केल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समिती सदस्य पदाचा लवकरच शहरी दक्षता समितीचे अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची माहिती प्रशांत नाईक यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार करणार आहे.

शहरी दक्षता समिती गेल्या ६ महिन्यापासून नेमण्यात आलेली आहे. समितीची एकच बैठक ओळख-परिचयची झाली आहे. याशिवाय समितीची बैठकच झाली नसून समिती केवळ नावापुरता राहिलेली आहे. गोरगरीब जनतेला धान्य मिळत आहे की नाही तसेच त्यांच्या तक्रारी, समस्या याबाबत समितीची कुठलीही बैठक झालेली नाही. तसेच रेशनिंग दुकानदारांच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला आहे. मात्र शहरी दक्षता समितीच्या सदस्यांना हा अहवाल का उपलब्ध करून दिला जात नाही असा सवाल प्रशांत नाईक यांनी विचारला आहे.

तसेच १२३ दुकानदाराविषयी देखील सातत्याने माहिती मागितली असता तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी दिलेली नाही. १२३ दुकानदारांनी नागरिकांचे थम्ब इम्प्रेशन घेतले. त्याबाबत धान्य उचल केले. मात्र त्यांना धान्य दिले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे.

तसेच अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनीही जनजागृती केली आहे. मात्र तहसीलदार आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये काही मिलीभगत आहे का असा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्याबाबत देखील काही माहिती मिळत नसल्याने समिती सदस्य तथा महापालिकेचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी शहरी दक्षता समितीच्या तहसीलदारांच्या व्हाट्सअप ग्रुप वर विचारले असता तहसीलदारांनी उत्तर देण्याचे टाळून सदस्य असलेल्या प्रशांत नाईक यांना चक्क ‘रिमूव’ करीत ग्रुपबाहेर केले. याचा अर्थ काय धरायचा? तहसीलदार यांचा भ्रष्ट रेशन दुकानदारांशी काही संबंध आहे काय असा सवाल यानिमित्त निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया प्रशांत नाईक यांनी दिली आहे.

दरम्यान, रेशन दुकानदारांचा संबंधित असलेल्या तक्रारी, समस्याचा निपटारा होत नसल्याने व समिती केवळ नावाला असल्याने लवकरच शहरी दक्षता समितीचे अध्यक्ष यांच्याकडे शहरी दक्षता समिती सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याची माहितीही प्रशांत नाईक यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button