जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात हल्ले करून पैसे लुटण्याचा प्रकार घडत आहे. काल रात्री केळी विकून व्यापाऱ्याकडून पैसे घेऊन परत येणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करून ५० हजाराच्या रोकडसह हातातील सोन्याचे ब्रेसलेट, अंगठी काढून हल्लेखोर पसार झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास भोकर-भादली दरम्यान ही घटना घडली. निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय ३७, रा. भादली-भोकर, ता. जळगाव) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत असे की, व्यापाऱ्याला केळी विकल्यानंतर पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे गावातच राहणाऱ्या विठू उर्फ प्रकाश याच्यासोबत दुचाकीने भोकर गावी गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रुपये घेऊन परत येताना गावापासून काही अंतरावर दुचाकीने आलेल्या पाच जणांनी त्यांना अडवले. त्यांनी साळुंखे यांच्याकडे पैशांची मागणी केली. या वेळी साळुंखे यांनी विरोध केल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. क्षणार्धातच अडवणाऱ्या एकाने साळुंखेंंच्या कपाळावर लाकडी दांडा मारला. त्यात जखमी झालेल्या साळुंखेच्या हातातून एकाने दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, एक तोळ्याची अंगठी ओरबाडून काढली. ५० हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लूटमार करणारे पसार झाले. साळुंखे यांना मारहाण हाेत असतानाच साथीदार विठू हा पळून गेला होता. जखमी अवस्थेत साळुंखेंनी गावात राहणारे विजय गोपाल पाटील या चुलत भावास फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांत पाटील यांच्यासह गावातील तरुण आले. त्यांनी जखमी साळुंखेना सोबत घेऊन सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरून घरी जात असताना साळुंखे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. पोलिसांत तक्रार करण्यात आलेली नव्हती.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना