⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | कृषी | प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केळी उत्पादक शेतकरी रडकुंडीला

प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केळी उत्पादक शेतकरी रडकुंडीला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । अवकाळीने फळबागांचे मोठे नुकसान झाले असून निसर्गाचा लहरीपणा तर यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेलाच आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून केली उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला असून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न देखील निघत नाही. (Banana) केळीला ठरलेल्या दराच्या तुलनेत यंदा निम्यानेही दर मिळत नाही. दुहेरी संकटातून मुक्त होण्यासाठी (Farmer) शेतकरी थेट बागांवर कुऱ्हाडच चालवत आहे. मध्यंतरी नांदेडमध्ये करपा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याने बागच तोडून काढली तर आता घटत्या दरामुळे केळी बाग का जोपासावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

प्रत्येक फळाचे दर हे शासनस्तरावर ठरलेले असतात. त्याचप्रमाणे केळीला 1 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर ठरला होता. त्यामुळे भरघोस उत्पादन होईल असा आशावाद फळबागायत शेतकऱ्यांना होता. पण निसर्गाप्रमाणेच शासनाची धोरणेही बदलली. गेल्या काही महिन्यांपासून 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी केली जात आहे. त्यामुळे वर्षभर जोपासना करुन 300 रुपयांचा दर कसा परवडेल असा प्रश्न आहे. त्यामुळेच शेतकरी काढणी आणि वाहतूकीचा खर्च करण्यापेक्षा केळीच्या बागेवर कुऱ्हाड चालवणे पसंत करीत आहे. शेतात दमदार माल असताना देखील व्यापारी माल घेऊन जात नसल्याने तो तोडून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शासकीय भाव नावालाच, प्रत्यक्षात मात्र वेगळेच

उत्पादन काढण्यासाठी अथक परिश्रम करुनही शेतकरी मालाचा दर ठरवू शकत नाही. बाजार समितीमध्ये याचे दर ठरतात. त्याचप्रमाणे केळीला 1 हजार रुपये क्विंटलचा दर हा ठरलेला आहे. मात्र, आता कोरोनामुळे उठावच नसल्याचे सांगत खरेदीदार अन् व्यापारी हे संगनमत करुन दर पाडत असल्याचा आरोप पाचोरा तालुक्यातील शेतकरी संघटनेने केला आहे. या दरावर प्रशासनाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे मागेल त्या दरात शेतकऱ्यांना केळीची विक्री करावी लागत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी विक्री न करता बागच शेतीबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
यंदा तीन ते चार वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह खरीप, रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. सातत्याने होणारे नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. यातच दर घसरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागेची तोडणी केली आहे. आता व्यापारी आणि शेतकरी यांची बैठक घडवून योग्य तो निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा अधिकच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यावल, रावेर परिसरातील केळी उत्पादक कमालीचे चिंताग्रस्त झाले असून जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.