शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक केली जात असल्याने शेतकऱ्यांची कापणीवरील केळी बागेतच पिकत असून व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या अडवणूकीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने उडीद, मूग या कडधान्यांसह ज्वारी, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव जाणवत आहे. केळीच्या घडांवर काळे डाग पडले असून करप्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यात दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उसनवारी करून दिवाळी साजरी करावी लागत आहे. त्यात सरकारने अद्याप मदत न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

व्यापाऱ्यांकडून अडवणूक
केळी या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंतेत असतांना केळी मालाला मागणी नसल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांकडून देखील केळी उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. केळीची सरासरी ४०० ते ५०० रूपये भावाने कापणी सुरू आहे. त्यातही पूर्ण गाडी माल असेल तर येऊ. अन्यथा केळी कापणार नाही, असा पवित्रा व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे, यामुळे अनेक शेतकऱ्यांची कापणीवरील केळी बागेतच पिकत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज