भगवंतांची भक्ती मनापासून केली तरच परमेश्वर प्राप्ती : हभप ज्योतीताई गरुड
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । भगवंताने गीतेमध्ये चार महत्त्वाचे अभंग सांगितले आहेत.मनाने आणि बुद्धीने केलेलीच भक्ती भगवंताला लागते.या भक्तीमुळे भगवान प्रसन्न होत असतात. भक्तीसाठी फक्त वाचायचे असते असे नाही तर भक्ती अनुभवायची देखील असते.त्याच्यातच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होत असते.असे मार्गदर्शन कीर्तन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुणे जिल्ह्यातील चाकण येथील हभप ज्योतीताई गरुड यांनी केले.
नेहरूनगरातील शिवराजे फाउंडेशनद्वारा श्रीमद् भागवत संगीतमय कथा आणि हरिकीर्तन सप्ताहाचे दि. १२ ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी हभप ज्योतीताई गरुड यांनी भाविकांना भक्तीरसाचा आनंद देत भक्तीची महती सांगितली.
हभप ज्योतीताई गरुड म्हणल्या की, भक्ती कशी करावी याबाबत संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत तुकाराम यांच्या रचनांमधील भक्ती आणि बलशाली हनुमान, राजा भरत, श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन यांच्या आयुष्यातील भक्तीचा अर्थ ज्योती गरुड यांनी उलगडून दाखविला. संतांचे विविध अभंग सांगून त्याच्याद्वारे भाविकांना भगवंताची भक्ती कशी करावी याची माहिती दिली. आपले शरीर संसारात तर मन भगवंतांच्या भक्तीत असले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.
रविवारी दि.१९ रोजी श्रीमद भागवत कथा आणि हरिकीर्तन सप्ताहाचा समारोप सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर होणार आहे. हे कीर्तन वृंदावन येथील भागवताचार्य हभप सोपानदेव महाराज करणार आहेत. त्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मनपाचे आरोग्य सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक व शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले आहे.