जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । जगभर प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहेत. जळगाव व्यापाऱ्यांच्या मनमानी व आडमुठेपणामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. बोर्डाच्या भावाप्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी यावल तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन कमलाकर हिरामण पाटील (Kamalakar Patil) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, त्यासाठी उत्पादन खर्च देखील जास्त येतो. जेवढा उत्पादन खर्च तेवढी रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात व्यापारी फक्त २०० ते २५० रुपये प्रति क्विंटल दराने केळी खरेदी करीत असून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. केळी खरेदी करतांना मापात पाप करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी चौकशी करणे आवश्यक आहे.
हे लोकप्रतिनिधी व अधिकारी उघड्या डोळ्यांनी बघत असतांनाही दखल घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींकडेही हा प्रश्न मांडला मात्र कुणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा संकटात असताना देखील जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून ते व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.