⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | बातम्या | ५४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची अपर पोलीस महासंचालकांकडून प्रशंसा

५४ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची अपर पोलीस महासंचालकांकडून प्रशंसा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ५४ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.
पहूर पोलिस ठाण्यांतर्गत कापूस विक्रेत्याला पिस्तूलचा धाक दाखवून लुटीच्या गुन्ह्यात २४ तासात आरोपींना ताब्यात घेतले. पावणे पाच लाख रुपये, पिस्तुल व इतर मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आला. भडगाव पोलिस ठाण्यांतर्गत अमडदे गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून दागिन्यांसह सीसीटीव्हीसह डीव्हीआर चोरुन नेण्यात आले होते. या गुन्ह्यात तीन तासात संशयितांची नावे निष्पन्न करुन दागिने, सीसीटीव्ही, डीव्हीआर हस्तगत करुन पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला. फरकांडे येथील कापूस व्यापारी खून प्रकरणात ७२ तासात संशयितांचे नाव निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यांतर्गत वढाेदा वनक्षेत्रातील खून प्रकरणात संशयितांना दोन दिवसात अटक करुन गुन्हा उघडकीस आणल्याबाबत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देवून गौरवण्यात आले.

अपर पोलीस महासंचालकांच्या हस्ते एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, भडगाव निरीक्षक अशोक उतेकर, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, मुक्ताईनगर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.