जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । कृषिपंप वीजग्राहक शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात थकीत वीजबिलातून वसूल झालेल्या ६६ टक्के कृषी आकस्मिक निधीचा वापर करत जळगाव परिमंडलात ५ हजार ८१९ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन आपल्या गावातील विद्युत यंत्रणा सक्षम करण्यासाठी कृषिपंपाच्या थकबाकीसह चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात जळगाव परिमंडलात आजपर्यंत कृषिपंपांची १२६ कोटी ३७ लाख रुपयांची वीजबिले भरून शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. एक गाव एक दिवस, ग्राहक मेळावे, बैठका अशा विविध उपक्रमाद्वारे कृषिपंपधारक शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्त अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे.
५०४ कोटी ३० लाख रुपयांची सूट
या योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ६४ हजार १५२ शेतकऱ्यांकडे एकूण ५४२२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणकडून निर्लेखन व वीजबिल दुरुस्ती समायोजन करून शेतकऱ्यांकडे ३,५२३.३० कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १,७६१ कोटी ६५ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १,७६१ कोटी ६५ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. महा कृषी ऊर्जा अभियानात सहभागी झालेल्या जळगाव परिमंडलातील १ लाख १३ हजार ७४९ शेतकऱ्यांना ५०४ कोटी ३० लाख रुपयांची सूट मिळालेली आहे.
थकबाकीमुक्तीची सुवर्णसंधी
जमा झालेल्या वीजबिलातून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायतीअंतर्गत व ३३ टक्के रक्कम ही जिल्हांतर्गत कृषी आकस्मिक निधी म्हणून वापरली जात आहे. या निधीतून नवीन वीजजोडण्या देण्यासोबतच विजेच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्याची कामे केली जात आहेत. या निधीद्वारे जळगाव जिल्ह्यातील ३४४०, धुळे जिल्ह्यातील १५५१ तर नंदुरबार जिल्ह्यातील ८२८ शेतकऱ्यांना वीजजोडणी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी महा कृषी ऊर्जा अभियान ही थकबाकीमुक्तीची सुवर्णसंधी आहे. या योजनेत कृषिपंपधारकांनी सहभागी होत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील विद्युत यंत्रणेचा विकास साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप थकबाकी भरली नाही त्यांनी पुढे येऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव परिमंडलाच्यावतीने करण्यात आले आहे.