विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन, विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीचे ठिय्या आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । अकृषी विद्यापीठातील ७९६ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची सुधारीत वेतन संरचना लागू करणे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवार दि.७ रोजी उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सह संचालक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या महासंघांची संयुक्त कृती समिती असलेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशान्वये १२/२४ चा आश्वासित प्रगती योजनेचा शासन निर्णय, अकृषी विद्यापीठातील ७९६ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची सुधारीत वेतन संरचना लागू करणे, ५८ महिन्यांची थकबाकी यासह विविध प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन शासनाने त्याची तात्काळ पूर्तता करावी, यासाठी महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या माध्यमातून दि.१६ नोव्हेंबर, २०२१ पासून आंदोलनास सुरूवात केली असून दि.७/१२/२०२१ रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सह संचालक कार्यालयतील प्रशासकीय अधिकारी देवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कृती समितीचे मुख्य संघटक तथा महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब त्रिभुवन, कृती समितीचे प्रवर्तक तथा महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अरूण सपकाळे, राजू सोनवणे, कृती समितीचे कार्यालयीन सचिव प्रमोद चव्हाण, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तुलाराम गणपत भारूडे, उपाध्यक्ष साधू भिमराव तागडे, गोपाल सोनवणे, नितीन धनसिंग पाटील आदी उपस्थित होते.