मराठा महासंघाची यावल तालुका कार्यकारिणी जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । यावल येथे मराठा महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात यावल शहराध्यक्षपदी भूषण खैरे यांची तर तालुका कार्याध्यक्षपदी गिरीष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा आशीर्वाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात यावल शहराध्यक्षपदी भूषण खैरे, तालुका कार्याध्यक्षपदी गिरीष पाटील यांच्यासह लखन पवार, मयुर पाटील, स्वप्नील कोलते, रणधीर पाटील, आशुतोष पाटील, गोपाल कोलते, विजय इंगळे, भूषण अहिरे, निलेश भोईटे, रितेश पाटील, आकाश जाधव, चेतन पाटील, राकेश शिर्के आदींची निवड करण्यात आली.
तरुणांना उद्योग-व्यवसायात संधी
कार्यक्रमात प्राध्यापक मनोज पाटील यांनी मराठा महासंघाचे ध्येयधोरणे आणि भविष्यातील वाटचाल कशी राहील, संघटन वाढवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्या, व्यवसाय करावा, यात चांगली संधी असून या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले. तर प्रा.अजय पाटील यांनी मराठा समाजातील लग्न संस्कार या संदर्भात मार्गदर्शन करताना लग्न साध्या पद्धतीने करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा व होणारा खर्च कमी करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाटील यांनी तर सूत्रसंचालन ॲड. देवकांत पाटील यांनी केले. आभार मयुर पाटील यांनी मानले.