जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही फोन टॅप करण्यात आल्याची माहिती दिलीय. मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचं सांगितलंय.
मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असा मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना त्या कालखंडात देखील माझा फोन टॅप होत होता. त्यामुळे तेव्हापासून माझी तक्रार आहे. त्यावेळेस माझ्या तक्रारीनंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीनी चौकशी केली होती, त्या कालखंडापासून तर आतापर्यंत मला शंका आहे की माझा फोन टॅप होत होता. तसे मला जाणवत होते. त्यामुळे त्यातील तथ्य काय आहे हे मी सरकारला पत्राद्वारे विनंती करणार असल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगितलंय.
विशेष म्हणजे फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची इत्यंभूत माहिती फडणवीस यांच्या हाती लागली होती. हा डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते. तसेच याप्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, असा आग्रह आता भाजपने धरला आहे. त्यामुळे आता सावध झालेल्या ठाकरे सरकारने प्रत्येक पाऊल जपून टाकायचे ठरवले आहे.