जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाची दिग्गज व्यक्तिमत्व गुलाबराव देवकर हे गेल्या काही वर्षापासून सक्रिय राजकारणापासून लांब होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर जिल्हा बँकेच्या चाव्या पुन्हा आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी ठरले. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष निवडीचे अधिकार खडसेंना दिल्याने त्यांनी देखील पहिलीच संधीची माजी मंत्री गुलाबराव देवकरांना दिली आहे. अध्यक्षपदी निवड होताच देवकर समर्थकांनी केलेला जल्लोष त्यांच्या कमबॅकचे शक्तीप्रदर्शन दाखविणारा होता. देवकर जिल्हा बँकेत अध्यक्ष झाल्याने आपसूकच ते सक्रिय राजकारणात आले आहेत. देवकरांच्या निवडीने खडसेंचे वर्चस्व आणि देवकरांचा पुढील भविष्यवेध स्पष्ट झाला असून यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
गुलाबराव देवकरांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला वेगळे वळण देणारी ठरणार आहे. जळगावचे पालकमंत्री असताना गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या मतदार संघातच नव्हे तर जिल्हाभरात अनेक ठोस काम केले होते. जळगाव शहरातील लांडोरखोरी उद्यान आणि छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह त्यांच्याच काळात मंजूर झालेला प्रकल्प आहे. धरणगावचा रेल्वे उड्डाणपूल, अनेक सिंचन प्रकल्पांना त्यांनी निधी मिळवून दिला होता. शांत, संयमी आणि सर्वांना घेऊन चालणारे तळागाळातील व्यक्तिमत्व म्हणून गुलाबराव देवकरांची ओळख आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघ आजवर आलटून पालटून नेतृत्व देत राहिला आहे. गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटलांचा पराभव केल्यानंतर मतदारसंघात त्यांनी चांगली पकड जमवली होती. पक्षात देखील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध देखील घनिष्ट होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर घरकुल प्रकरणी कारागृहात असल्याने ते जनतेच्या थेट संपर्कात नव्हते मात्र त्यांचा मुलगा विशाल देवकर याने मतदारसंघात प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि त्यांना चांगली मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत देवकरांना पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने ते लोकसभेच्या रिंगणात उतरले पण भाजपसमोर त्यांचा निभाव लागला नाही. ऐनवेळी तयारीला लागून देखील त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र देवकर जरा अलिप्तच झाले.
गेल्या काही महिन्यांपासून गुलाबराव देवकर पुन्हा पक्षात चांगले सक्रिय झाले आहे. देवकर बाहेर दिसत नसले तरी मतदारसंघात मात्र त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्ह्यात अनेक घडामोडी, आरोप-प्रत्यारोप काही महिन्यात झाले परंतु देवकरांनी त्यावर भाष्य करणे टाळले. पक्षात कोणाशीही दुश्मनी नको हे तत्व त्यांनी पाळले. जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादीत पक्षात घेण्याअगोदर देखील पक्षश्रेष्ठींनी देवकरांना विचारणा केली होती आणि त्यांनी देखील सकारात्मक बाजू मांडली होती. कदाचित आज जिल्हा बँकेत खडसेंनी दाखविलेली विश्वास हा त्याचेच फळ असावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून देवकरांना पुन्हा ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी बांधवांशी संपर्क करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे सोपे होणार आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघाने गुलाबराव पाटलांना दोन वेळा संधी दिल्याने मतदार संघात त्यांनी चांगले वर्चस्व निर्माण केले आहे. सध्या महाविकास आघाडी असल्याने गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटलांच्या विरोधात जाणार नाही हे मात्र निश्चित आहे.
गुलाबराव देवकर यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी लागलेली वर्णी जिल्हा राष्ट्रवादीत मोठा फेरबदल घडवून आणणार याचे सूचक आहे. जिल्हा राष्ट्रवादीत सध्या जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती आहे. खडसे गटातील एक-एक व्यक्ती सध्या विविध पदांवर भूमिका बजावत असून विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील यांची वर्णी महामंडळावर लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ऍड.पाटील महामंडळावर गेल्यास ऍड.रोहिणी खडसे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. एकनाथराव खडसे सध्या कोणत्याही पदावर नसल्याने आपल्या मुलीच्या राजकीय भवितव्यासाठी ते पक्षाचे नेते खा.शरद पवार यांना गळ नक्कीच घालू शकतात. ऍड.रोहिणी खडसे सध्या तरी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करून असल्याने जळगावात त्यांचा फारसा रस नाही मात्र जळगाव ग्रामीण मतदार संघ सोडला तर जळगाव शहराकडे गुलाबराव देवकर लक्ष देण्याची दाट शक्यता आहे.