⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

सावदा-आमोदा रस्तावर अपघात; १ ठार ५ जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून बुधवारी चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर, पाचोरा तालुक्यातील पिंपळगावजवळ अपघात झाल्याची घटना ताजी असतांना गुरुवारी सावदा-आमोदा रस्तावर पुन्हा एक अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील रहिवाशी भरत वसंतराव सुपे यांच्या मोठ्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. लग्नानंतर दि.५ रोजी कार्यक्रम (रिसेप्शन) असल्याने ते कामानिमित्त त्यांची फॉर्च्युनर कार (क्र. डी.एल.१०, ई.६१६५ ने जळगावकडे जात होते. यावेळी सावदा ते पिंपरुळदरम्यान जळगावकडून येणारी इंडिका गाडी (क्र. एम.एच.१९, ए.पी.२६१२) यांच्यात अपघात झाला. अपघातादरम्यान फॉर्च्युनर कार एका शेतात घुसून एका मोठ्या झाडावर आदळली. यात फॉर्च्युनर कारमधील भावना भरत सुपे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सुपे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन दिवसात ४ अपघात
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी २ दिवसात ४ अपघात झाले असून यात ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील क्रूझर गाडीला चाळीसगाव जवळील हिरापुरजवळ भीषण अपघात झाला. यात पाच जण जागीच ठार झाले. त्याच दिवशी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) ते भोजेदरम्यान दोन मोटरसायकलींमध्ये जोरदार धडक झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तिसरी घटना नगरदेवळाजवळ घडली यात जळगावकडून पुणेकडे जात असलेली ट्रॅव्हल्स टँकरवर धडकली होती. सुदैवाने या अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवासी बचावले.