देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे जळगावातील तरुणाच्या हाती !
जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा नेहमी काही ना काही बाबतीत चर्चेत असतो. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारी एक बाब नुकतेच घडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या केंद्रीय अर्थमंत्रालयातील जीएसटी आणि प्राप्तिकर अशा दोन्ही प्रमुख अर्थ घटकांशी संबंधित विभागातील समन्वयाची सूत्रे सध्या जळगावच्या अमित भोळे यांच्याकडे आहे. अमित २०१० च्या बॅचचे आयसीएएस अधिकारी असून त्यांची नुकतीच अर्थमंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे.
देशासह जगातील वेगवेगळ्या क्षेत्रात जळगावकर आपला ठसा उमटवित आहेत. अमेरिकेच्या शेअर बाजारात टॉप कंपनी असो की नौदलात उपलेफ्टनन म्हणून पदोन्नती असो, जळगाव नेहमी अव्वल आहे. जिल्ह्यातीलही हजारोंच्या संख्येने तरुण सरकारी आणि खासगी कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चपदापर्यंत पोहचले आहेत.
जळगाव तालुक्यातील भादलीचे अमित गुणवंत भोळे हे मूळ रहिवासी असून वडील निवृत्त वैद्यकीय अधिकारी, आई गृहिणी अशा सामान्य कुटुंबातील ते सदस्य आहेत. अभियांत्रिकीची पदवी बारावीपर्यंतचे शिक्षण जळगावी पूर्ण केल्यानंतर अमित यांनी पुण्यातून मेकॅनिकलमधून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकीतील करिअर डोळ्यासमोर असतानाही सिव्हिल सर्व्हिसेसची आवड असल्याने त्यांनी मुंबईच्या सिडेन्हाम महाविद्यालयातून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी एलआयसी व युनायटेड वेस्टर्न बँकेतही अधिकारी सेवा बजावली. कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यांनी काम केले. सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुच ठेवली. २०१० मध्ये त्यांची आयसीएएस (Indian civil accounts service) मधून निवड झाली आणि त्यांनी केंद्रीय मंत्रालयात अधिकारीपदाची धुरा हाती घेतली.
प्रशासकीय सेवेतील निवडीनंतरही त्यांची शिक्षणाप्रति ओढ संपली नाही. त्यांनी अर्थशास्त्रातून एम. ए. पूर्ण केले. रेल्वे, वाणिज्य उद्योग मंत्रालय केंद्रीय प्रशासकीय सेवेत त्यांनी महत्त्वाच्या रेल्वे, वाणिज्य व उद्योग अशा तीनही मंत्रालयात सेवा बजावली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संजय धोत्रे यांचे विशेष अधिकारी (ओएसडी) म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. उपसचिवपदी नियुक्ती संजय धोत्रे यांच्याकडील सेवेनंतर आता अलीकडेच अमित यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे प्राप्तिकर आणि जीएसटी या दोन्ही करप्रणालीत समन्वय साधण्यासंबंधीचे काम आहे.