महिलांवरील हिंसाचार ही एक मोठी सामाजिक समस्या : प्रा. संदीप केदार
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । महिलांनी बोलले पाहिजे आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. महिलांवरील हिंसाचार ही एक खूप मोठी सामाजिक समस्या आहे, जी उदारमतवादी समाजांपासून कट्टरपंथी समाजापर्यंत एक मोठी समस्या म्हणून पाहिली जाते. जगातील अनेक देशांमध्ये हिंसा आणि महिलांवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असे मत जनसंवाद व पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. संदीप केदार यांनी व्यक्त केले.
शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन सप्ताह दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, उपप्राचार्य केतन चौधरी, डॉ. शैलजा भंगाळे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अशोक राणे यांनी, महिला दिनासारख्या दिवसांमध्ये महिलांच्या हक्कांवर खूप चर्चा केली जाते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी एक दिवस स्वतंत्रपणे देखील साजरा केला जातो. दुर्दैवाने, ती एक मोठी गरज बनली आहे. एवढेच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये जिथे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक अधिकार मिळाले आहेत. तरीही महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची प्रासंगिकता कायम आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलजा भंगाळे यांनी केले तर आभार प्रा. गणेश पाटील यांनी मानले.