ईपीएफओ कार्यालयातर्फे आयोजित शिबिरात ‘ई-नोमिनिशन’वर चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालयातर्फे गुरुवार दि.२५ रोजी जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ईपीएफओच्या नवीन उपक्रमाबाबत शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई-नोमिनेशनचे महत्व व ईपीएफओ संबंधित नवनवीन घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, भारत सरकारच्या श्रम एवं रोजगार मंत्रालयाचे क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिलकुमार प्रीतम, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त डॉ. रामकृष्ण त्रिपाठी, सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप आदी उपस्थित होते. प्रभाकर बाणासुरे यांनी ई-नोमिनेशनचे महत्व व ईपीएफओच्या नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावुन सांगितल्या. जळगावच्या जिल्हा कार्यालयाचे क्षेत्रीय कार्यालय म्हणून रूपांतरित होणेसाठी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
अध्यक्षीय भाषणात क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिल कुमार प्रीतम, यांनी ई-नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, महत्व व ईपीएफओचे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावून सांगितल्या. यावेळी उपस्थित आस्थापनांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभाग पर्यवेक्षक रविंद्र मराठे यांनी केले तर आभार सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप यांनी मानले.