जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला रस्त्यावर बुधवारी रात्री वाळूचे डंपर पकडल्याच्या मुद्द्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. हाणामारीत एका चारचाकीची तोडफोड देखील करण्यात आली आहे. दोन्ही गटाकडून दोन दिवसात कुणीही फिर्याद देण्यासाठी न आल्याने शहर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासात दोन्ही गटातील ७ जणांची नावे निष्पन्न केली आहेत.
शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक करुणासागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२५ रोजी रात्री करुणासागर जाधव आणि बापू मोरे असे रात्र गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी संजय बडगुजर यांनी मोबाइलवर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी यांनी पोलीस ठाण्यात माहिती देत कोर्ट चौकाजवळ हॉटेल मोराको समोर लाठी वकिलांच्या घराजवळ वाद सुरु असून चारचाकीची तोडफोड केली जात असल्याचे कळविले.
शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करुणासागर जाधव, गजानन बडगुजर, रफिक पटेल, हवालदार संजय भांडारकर, नामदेव पाटील असे सर्व रात्री २.५० वाजता त्याठिकाणी पोहचले असता ७ इसम हाणामारी करीत होते तर त्यातील दोन-तीन जण चारचाकी क्रमांक एमएच.१५.बीएस.४१४१ ची सळईने तोडफोड करीत होते. पोलिसांना पाहताच सर्वांनी पळ काढला. पोलिसांनी चारचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली. दोन दिवसात कुणीही तक्रार देण्यासाठी न आल्याने पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मिलिंद अशोक सोनवणे, दीपक विजय सपकाळे, रविंद्र सुभाष ठाकूर, चंदन कोल्हे, हर्षल इंगळे, सचिन पाटील, भूषण सपकाळे यांची नावे निष्पन्न झाली आहे.
शहर पोलीस ठाण्यात कलम १६०, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीचे नेमके कारण काय? आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात असून घटनास्थळी हवेत फायरिंग झाल्याची चर्चा असल्याने पोलीस त्याबाजूने देखील तपास करीत आहेत.