जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअरबाजार ११७०.१२ अंकांनी कोसळल्याने चांगलाच फटका बसला. तब्बल ७.८६ लाख कोटींचे नुकसान झाल्याने गुंंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी देखील शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. भारती एअरटेल, एशियन पेंट्स, पावरग्रिड आणि टीसीएस या चार कंपनीचे शेअर वगळता तब्बल २६ शेअर हे धोक्याच्या पातळीवर कारभार करत होते. रिलायंस इंडस्ट्रीज, टायटन, मारूती, एसबीआय, एचडीएफसी बँक यांच्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली होती. त्याचे परिणाम आज (दि.२२) रोजी देखील दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट ११७०.१२ अंकांनी कोसळल्याने त्याचा गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला. गुंतवणूकदाराचे ७.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप शुक्रवारी २,६९,२०,१९६.९९ कोटी रुपये इतकी होती. सोमवारी शेअर मार्केट गडगडल्याने त्यामध्ये घट होऊन ती २,६३,७८,४६३.३८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.