रावेर विकासो मतदारसंघातून जनाबाई महाजन विजयी
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रावेर विकासो मतदारसंघातून माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांना एक मताने पराभूत करत जनाबाई गोंडू महाजन यांनी एक मतांनी विजय मिळविला आहे.
सविस्तर असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघांत खूप नाट्यमय घटना घडल्या. यात राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी आधीपासूनच तयारी केल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात राहतील असे स्पष्ट संकेत मिळाले होते. तर त्यांच्या विरूध्द नंदू महाजन आणि अन्य उमेदवार अशी लढत होईल असे मानले जात होता. मात्र, नंदू महाजन यांनी भाजपच्या निर्णयानुसार माघार घेतली. मात्र, ही जागा कॉंग्रेसला सोडल्याने अरूण पाटील यांनी थेट भाजपचा पाठींबा मिळविली. भाजपने त्यांना पुरस्कृत केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी दिली. तर माजी उपाध्यक्ष राजीव पाटील हे देखील रिंगणात उतरल्याने तिरंगी सामना होण्याची शक्यता होती. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिल्यामुळे त्यांचा विजय एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पडद्याआड खूप काही वेगळेच शिजत होते. ते आज निकालातून दिसून आले.
आज झालेल्या मतमोजणीत माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांना २५ तर जनाबाई गोंडू महाजन यांना २६ मते मिळाली. यामुळे अरूण पाटील यांचा एक मताने पराभव झाला. शेवटच्या टप्प्यात गाफील राहिल्याने त्यांना हा धक्कादायक पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे.