जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवास क्षेत्र असलेल्या वढोदा वनक्षेत्रास धुळे वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी आज (दि.१८) रोजी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, वनसमिती अध्यक्ष शिवा पाटील यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व उपवनसंरक्षक विवेक होस्टिंग यांचेकडे व्याघ्र अधिवास क्षेत्रात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. दरम्यान, यासंदर्भात ‘व्याघ्र अधिवास क्षेत्रात विविध समस्यांचे ग्रहण’ या मथळ्याखाली ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने वृत्त प्रकाशित करुन जंगलातील वस्तुस्थीती मांडली होती. संबंधित वृत्ताची दखल घेत मुख्यतः वनसरंक्षक डिगंबर पगार यांनी आज (दि.१८) वढोदा वनक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी चर्चा करुन विविध समस्येविषयी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तसेच वनविभागातील कामांची पाहणी करुन संबंधित कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या.
बनावट वनदावे, वन्यप्राणी यांच्याकडून होणाऱ्या शेती पिकाची नुकसान भरपाई तसेच वनसंवर्धनाबाबत यावेळी चर्चा झाली. वनसंवर्धनकामी सहकार्याची भावना ठेवून वनविभागाला मदत करणाऱ्या स्थानिकांना वनमित्र म्हणून गौरविण्यात यावे, अशी संकल्पना वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे यांनी मांडली. याप्रसंगी सहाय्यक उपवनसरंक्षक कामडे, गस्ती पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. बच्छाव, मानद वन्यजीव संरक्षक राजेश ठोंबरे, रवींद्र फालक, श्री. सोनवणे, धनपाल पी.टी.पाटील, श्री. पाचपांडे, जि.प. सदस्य निलेश पाटील, सभापती विकास पाटील, अशोक कांडेलकर, शिवा पाटील, संदिप जावळे, विनोद दाटे यांच्यासह स्थानिक वन्यप्रेमी नागरीक उपस्थित होते.