जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । पाडळसरे ( ता. अमळनेर ) येथील धरणासाठी संकल्प चित्र तयार झाले आहे. मात्र, अद्याप त्यास अंतिम मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण सुरू झालेले नाही. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये नदी पात्रातील कामाला सुरुवात होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांनी दिली.
दरम्यान, या धरणासाठी आलेल्या १३५ कोटींपैकी फक्त २४ कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप पाडळसरे जनआंदोलन संघर्ष समितीने केला आहे. पाडळसरे जनआंदोलन संघर्ष समितीच्या सदस्यांनी सोमवारी निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांची भेट घेतली आणि धरणाविषयी माहिती घेतली.
शासनाच्या मंजूर १३५ कोटींच्या निधीपैकी खर्चिक निधीबाबत विचारणा केली असता, यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; तर मंजूर निधी व मागील बाकी निधी तातडीने मिळावा आणि या मार्चपर्यंत खर्च करण्यात यावा, अशी आग्रही मागणी समितीने केली.
नदी पात्रातील प्रस्तंभांचे संकल्प चित्र प्राप्त झाले आहे. मात्र त्याची तपासणी, खर्च, डिझायनिंग आदी बाबी तपासून अंतिम मान्यता देणे बाकी आहे. ती मिळाल्यावर नदी पात्रातील काँक्रिटीकरण काम सुरू होईल. २४ कोटींत फक्त माती काम झाले आहे. उर्वरित निधी प्रस्तंभ पुनर्वसन आदींसाठी खर्च होईल. असे चौधरी यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.
यांचा सहभाग होता
वेळी धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, महेश पाटील, सुनील पाटील, रणजित शिंदे, ऍड. तिलोत्तमा पाटील, गोकुळ बागुल, ऍड. कुंदन साळुंके आदी प्रमुख पदाधिकारी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते.