⁠ 
बुधवार, मे 15, 2024

माणुसकीची जाणीव करून देत मानव कल्याण समजविणारा ‘आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । आजचे जग दहशतवाद, जातीयवाद, हिंसा, प्रांतीयवाद, तीव्र राष्ट्रीयता, मूलतत्त्ववाद आदींमुळे अस्वस्थ आहे. त्यासाठी राष्ट्रकुल आपल्या सदस्य राष्ट्रांना आवाहन करते की जात, धर्म, भाषा, लिंग, राष्ट्र असे भेदभाव बाजूला सारून सकलांनी मानवतेच्या उद्धारार्थ सहनशीलतेची दोरी धरली पाहिजे. आज आपण या विषयावर का बोलतोय ? कारण आज आहे आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस जो १६ नोव्हेंबर रोजी जगभरात मनवला जात असतो.

सहनशीलता हाही एक सद्गुण आहे व त्यामुळे सर्वत्र शांती नांदते इतकेच नव्हे तर आथिर्क आणि सामाजिक प्रगतीस हातभार लागतो. १६ नोव्हेंबर १९९५ पासून ‘युनेस्को’ने या दिवसाची घोषणा केली होती. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना करीत असताना मानवतेची अस्मिता जपताना, मानवी मूल्यांची कदर करीत आपल्या पुढच्या पिढीला युद्धाच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी असहनशीलतेचा अंत व्हावा या उद्देशाने  मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून पृथ्वीवर सर्वत्र नि सतत शांती पसरावी यासाठी राष्ट्रकुल सतत प्रयत्नशील असते.

सन २००५ सालच्या विश्व परिषदेत या घोषणेचा पुनरूच्चार होऊन, राष्ट्रीय नेत्यांनी आणि त्यांच्या सरकारांनी सहनशीलतेला उत्तेजन देऊन वेगवेगळ्या समाजगटात, संस्कृती विभागात तसेच लोकांमध्ये संवाद घडवून आणला पाहिजे आणि त्यांच्यात परस्पर सहकार्याची भावना रूजवून प्रगतीच्या दिशेने नेण्यास प्रयास केले पाहिजेत. यावर भर देण्यात आला.

मतभिन्नता किंवा दुसऱ्याची मते लादून घेणे म्हणजे सहनशीलता नव्हे, तर परस्परावरील आदराने आणि एकमेकांशी करार करून जगण्याचा तो एक मार्ग आहे. जागतिक पातळीवरील विविधतेला न घाबरता तिचा अंगीकार करणे हाच तर सहनशीलतेचा पाया ठरतो. समाजातील विविध गटात मतभेद होऊ शकतात. पण ते मिटविण्यासाठी समर्थ यंत्रणा देखील कार्यरत असायला हवी. सहनशीलतेचा प्रसार होण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांची बांधिलकी या चळवळीसाठी आवश्यक आहे. आजचा दिवस याच संदेशासाठी प्रायोजित करण्यात आला आहे.