जळगावात महागाईविरुद्ध काँग्रेसचे उद्यापासून जनजागरण अभियान
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । केंद्र सरकारने देशभरात कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. या विराेधात काँग्रेसतर्फे १४ ते २९ नाेव्हेंबर दरम्यान, राज्यभरात जनजागरण अभियान राबवले जाणार आहे. शहरात पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांनी दिली.
माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून अर्थात १४ नाेव्हेंबरपासून अभियान राबविण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिले आहेत. १९ राेजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आहे. २५ राेजी स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी तसेच २६ नाेव्हेंबर राेजी संविधान दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयाेजन केले जाणार आहे. १४ राेजी पदयात्रा काढून महागाई विराेधात जनजागृती केली जाणार आहे.
यावेळी नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गाव-खेड्यांत जावून मुक्काम करण्याचे निर्देश आहेत. प्रमुख चाैकांत चित्रफितीव्दारे युपीएचे सरकार व बीजेपी सरकार यातील तफावत सादर केली जाणार आहे. देशभरात महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी मांडल्या जाणार आहेत. सदस्य नाेंदणीही करण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगितले. अभिनेत्री कंगणा राणावत हिने स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. राणावत यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.