जळगाव जिल्हाजळगाव शहर

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ ।  चालू हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कापुस पिक माहे डिसेंबर 2021 पर्यंत शेतातुन काढुन टाकावे व फरदड घेऊ नये, जानेवारी 2021 पासुन 5 ते 6 महिने कापुस विरहीत शेत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो, व त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

शेंदरी बोंडअळीला डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु, फरदडीमुळे जीवनक्रम चालु राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणा-या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो. फरदडीपासुन थोडेफार उत्पादन मिळत असले तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्र्रेडर यासारख्या यंत्राव्दारे पऱ्हाटयांचे छोटे छोटे तुकडे करुन ते जमिनीत गाडावेत,

 

हंगाम संपल्यावर हे करावे ?

हंगाम संपल्यावर शेतामध्ये शेळया, मेंढया तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे खाल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. कपाशीच्या पऱ्हाटयांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करुन बांधावर ठेवू नये, पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे, पऱ्हाटया शेतातुन काढल्यानंतर त्याची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा,इंधन ब्रिकेटस तयार करणाऱ्या कारखान्यांना द्यावेत अथवा शेतात बीडी कम्पोस्ट लावुन पऱ्हाटयांचे खतात रुपांतर करण्यात यावे.

पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील, मार्केटयार्ड जिनींग, प्रेसिंग मिल परिसरात कापसापासुन निर्माण झालेला कचरा, सरकीतील अळया व कोष नष्ट करणे तसेच त्याठिकाणी व कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे ( फेरोमन ट्रॅप्स ) लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करुन नष्ट करण्याबाबत संबंधितांना प्रवृत्त करावे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button