⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

कोविड लस घेतल्यानंतर मृत्यू?, नातेवाईकांचा आरोप, १७ तासांनी केले शवविच्छेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । कोविशील्डची लस टोचून घेतल्यानंतर एका ४७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरालगत असलेल्या बांभोरी येथे उघडकीस आली आहे. देविदास खडके (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी महानगर पालिकेच्या राजर्षी शाहू रुग्णालयात ही लस घेतली होती. मृत्यूनंतर तब्बल १७ तासांनी शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

याबाबत असं की, बांभोरी येथील खडके यांना ४ महिन्यांपूर्वी कोराेनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ३ महिन्यानंतर लस घेण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. साेमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी महानगर पालिकेच्या राजर्षी शाहू रुग्णालयात लस घेतली. त्यानंतर तिथे ते अर्धातास बसून होते. कोणताही त्रास न झाल्यामुळे त्यांना घरी जाऊ देण्यात आले. साडेतीन वाजेपासून त्यांचे डोके दुखायला लागले. त्यानंतर त्यांना उलटीही झाली. त्यामुळे ते थोडावेळ झोपले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते अंथरूणातून उठले आणि चक्कर येऊन खाली कोसळले. तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात आल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ न शकल्याने व्हिसेरा राखून ठेवला आहे.

लस घेतल्यानंतर २४ तासांच्या आत मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करावे आणि त्याची ध्वनीचित्रफित तयार करण्यात यावी, असा नियम आहे. त्यानुसार देविदास खडके (वय ४७) यांच्या मृतदेहाचे मंगळवारी दुपारनंतर विच्छेदन करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात एका वृद्धाचा लसीकरण केंद्रातच चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतरची सोमवारची ही दुसरी घटना आहे.