जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । हद्दपार असतानाही संशयीत गावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत संशयीताला अटक केली तर संशयीताकडे गावठी कट्टा व धारदार चाकू आढळल्याने तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयीताविरोधात हद्दपारीचे उल्लंघण तसेच आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हंसराज रवींद्र खरात (22, रा.समतानगर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना संशयीत खरात हा 1 रोजी मध्यरात्री 12.30 वाजता रेल्वे स्टेशनकडील आर.बी.सेकंड रेल्वे कॉलनीजवळ शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. संशयीत दुचाकीवर येत असतानाच त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, शंभर रुपये किंमतीचा चाकू व 30 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धूमाळ, बाजारपेठ शोध पथकातील प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, योगेश माळी, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, निलेश चौधरी, ईश्वर भालेराव, जीवन कापडे, परेश बिर्हाडे आदींनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन व प्रशांत लाड करीत आहेत.