लाच मागणाऱ्या पंटरला सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न, मात्र…
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही पंटरने लाच मागितली. या पंटरला सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न लाचलुचपच विभागाने केला. मात्र, पंटरला कुणकुण लागल्याने तो बेपत्ता झाला. मात्र, लाच मागितल्याच्या रेकॉर्डींगवरुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, भुसावळ येथिल प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे ( रा. भुसावळ ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदार वाहन प्रतिनिधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी ( एम.एच १९ सी.सी ७७०० ) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने आणखी ३०० रुपये लागतील असे सांगीतले. हे ३०० रुपये अधिकाऱ्यांच्या सह्यांपोटी लागतील असे सांगीतले होते.
ढेंगे यांनी याबाबत ८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार ११ रोजी भोळेला रंगेहात अटक करण्यासाठी ११ रोजी पथक जळगावात पोहोचले. यावेळी त्यांनी भोळे याला गाठुन पैशांबाबत बोलणी केली. ‘ऍक्श्युली खरी गोष्ट सांगा, भाऊसाहेबांचे किती असे सांगा’ अशी विचारणा केली असता भोळेने सांगीतले की, ‘२० रुपये भाऊसाहेब आणि साहेबाच्या स्टारचे १००, आणि ज्युनिअरचे ५० रुपये असे १७० रुपये आणि आपला पोरगा फी घेतो ३० रुपये’ असे २०० रूपये भोळेने लाच मागीतली. भोळेच्या सांगीतल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगीतले. यांनतर ढेंगे पुन्हा एसीबीच्या पथकाकडे आले होते. लाच मागितल्याच्या रेकॉर्डींगवरुन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.