जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात बुधवार 24 मार्च 2021 पासून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर ‘कोविड 19’ रुग्ण शोध मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ऑक्सिजनयुक्त बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा शोध लवकरच होवून त्यांना वेळेत औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या धर्तीवर बुधवारपासून ‘कोविड 19’ शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची माहिती, वय, तापमान, ऑक्सिजनची पातळी, सहव्याधी रुग्ण असल्यास त्याची माहिती, लसीकरण झाले किंवा नाही, कोविड 19 संशयित असलेल्या रुग्णाचे ठिकाण आदी माहिती संकलित केली जाणार आहे.
या मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार होवून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकांना खरी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
या शोध मोहिमेस लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवकांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.