दिवाळीच्या नावाखाली खंडणी मागणार्यांविरोधात तक्रार दाखल करा : डीवायएसपी वाकचौरे
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरातील काही प्रतिष्ठीत डॉक्टर्स, व्यापारी व कारखानदारांकडे दिवाळीच्या नावाखाली पैसे मागत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली असून या संदर्भात संबंधितानी न घाबरता पोलीस ठाण्यात येवून गुन्हा दाखल करावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.
गुरुवार दि.२८ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना पोलीस उपअधीक्षक वाकचौरे म्हणाले की, काही प्रतिष्ठीत डॉक्टर्स व व्यावसायीकांना धार्मिक स्थळे बांधण्याच्या तसेच दिवाळी देण्याच्या नावाखाली पैसे मागितले जात असून तशी माहिती गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला प्राप्त झाली आहे. ही बाब खंडणी प्रकारात मोडत असल्याने डॉक्टर्स, व्यापारी, कारखानदार व प्रतिष्ठीत नागरीकांनी न घाबरता शहर, बाजारपेठ, तालुका पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवल्यास दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. शहरात अवैध सावकारीच्या तक्रारी असल्यास त्याबाबतही तक्रार करावी आम्ही सावकारी प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करून लागलीच दखल घेवू, असेही ते म्हणाले.
अवैध बॅनर्स, होर्ग्डिंग्जवर होणार कारवाई
पोलीस उपअधीक्षक वाकचौरे म्हणाले की, शहर अथवा तालुक्यात कुणीही विना परवाना बॅनर्स किंवा होर्ग्डिंग्ज लावताना दिसून आल्यास पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार आहे. फटाका स्टॉल लावताना पूर्व परवानगी घेवूनच ते लावावेत शिवाय गर्दीच्या ठिकाणी अशी दुकाने दिसल्यास कारवाई करण्यात येणार असून बुधवारी मुख्य बाजारपेठेत १२ अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून अडथळा दिसून आल्यास नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१० तारखेपर्यंत फूट पेट्रोलिंग
दिवाळीच्या अनुषंगाने १० तारखेपर्यंत फूट पेट्रोलिंग करण्यात येईल तसेच शहरातील बाजारपेठ, जामनेर रोड, यावल रोड, रजा टॉवर भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागरीकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान दागिने तसेच रोख बँकेतील लॉकर्समध्ये ठेवावी व नजीकच्या पोलीस ठाण्यात सूचना करावी, असे आवाहन वाकचौरे यांनी केले. यावेळी बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत उपस्थित होते.