‘निसर्गमित्र’तर्फे ‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । निसर्गमित्र, जळगावतर्फे दि.५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ या विषयावर खुली महाराष्ट्रव्यापी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.
दि.५ नोव्हेंबर रोजी पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि दि.१२ नोव्हेंबर रोजी पद्मभूषण डॉ.सालीम अली यांची जयंती आहे. या दिवसांचे औचित्य साधून हा ‘पक्षी सप्ताह’ साजरा करण्यात येत असतो. जैवविविधतेतील मोठा घटक असलेल्या पक्ष्यांविषयी समाजात विविध समज, गैरसमज व अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. यामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यामुळे अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम व जादूटोणाविरोधी कायदा २०१३ नुसार पक्षांचा बळी देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. निसर्गप्रेमी नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
असे आहेत स्पर्धेचे नियम
स्पर्धकाने निबंधाच्या सुरवातीलाच आपले पूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, वय, व्हॉटसऍप क्रमांक व दिनांक लिहावा, निबंधाच्या प्रत्येक पानावर पान क्रमांक व पूर्ण नाव लिहावे, स्पर्धेचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील, निबंध ४५० ते ५०० शब्दात मराठीमध्ये लिहून दि.१२ नोव्हेंबरपर्यंत त्याचा फोटो काढून ८९९९८०९४१६ या व्हॉटसऍप क्रमांकावर पाठवावा. निबंधातून प्रथम, द्वितीय, तृतीय व पाच उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील. आणि विजेत्यांना त्यांच्या क्रमांकानुसार व अन्य स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दि.२१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या व्हॉटसऍप नंबरवर पाठवले जाईल, अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.