जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । धरणगाव येथे वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसाचा जनता कॅर्फ्यू जाहीर केला असून या कॅर्फ्युला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य केले.
धरणगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महसूल, पोलीस आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला गेला.
कालच संध्याकाळी सात ते आठ या एक तासात या तीनही प्रशासनाने संयुक्तिकरित्या संपूर्ण शहरात जनजागृतीपर फ्लॅग मार्च काढून नागरिकांना पाच दिवसाचा जनता कर्फ्यूत कोणीही दुकान उघडे ठेवू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण कोणी बाहेर फिरू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. या फ्लॅग मार्च मध्ये स्वतः प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तहसिलदार प्रथमेश मोहोळ जातीने पूर्ण जनजागृती रॅलीत सहभागी होते. त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला.
एरवी गर्दीचे असणाऱ्या ठिकाणांवर आज पूर्णपणे सामसूम होते. दुकाने तर सगळी बंद होतीच परंतु रस्तेही निर्जन होते. नगरपरिषद, महसूल व पोलीस यंत्रणा यांची पथके ठिकाणी गस्त घालून पाहणी करत होती. न ऐकणाऱ्यांवर वचक बसला पाहिजे म्हणून यंत्रणा दिवसभर सज्ज होती. आजचा पहिला दिवस कडकडीत धरणगावात यशस्वी झाला.