⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रात्यक्षिक शिवाय विज्ञानाचे शिक्षण अपूर्ण : आयएएस राजेश पाटील

प्रात्यक्षिक शिवाय विज्ञानाचे शिक्षण अपूर्ण : आयएएस राजेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। ‘प्रात्यक्षिक शिवाय विज्ञानाचे शिक्षण नेहमी अपूर्ण राहते, नोबेल फाउंडेशनने विज्ञान क्षेत्रात या माध्यमातून सकारात्मक पाऊल उचलले आहे, यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे उत्तम शिक्षण मिळेल’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

नोबेल फाउंडेशन आयोजित प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील, कुतूहल संस्थेचे महेश गोरडे, इतिहास लेखक रामचंद्र पाटील, शिक्षक अतुल पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, तुमच्या जीवनात भूतकाळाचा आणि परिस्थितीचा काहीही संबंध नसतो. तुम्ही वर्तमान काळात किती मेहनत घेता यावर यश अवलंबून असते. ज्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रात अभ्यास, परिश्रम आणि आत्मविश्वासाने उच्च स्थान प्राप्त करता येते. कोणत्याही परीक्षांची तयारी करताना आकलन महत्त्वाचे असते. नुसत्या पाठांतराने आपण ज्ञानी होत नाहीत. सखोल वाचन, मनन व उजळणी यामुळे दीर्घकाळ ज्ञान टिकते.

खडतर मार्ग आपल्याला परिपक्व करतात
तहसीलदार नामदेव पाटील म्हणाले की, शिक्षण घेत असताना मोठा विचार करा. आपल्या कमतरता यांचा विचार करू नका. खडतर मार्ग आपल्याला परिपक्व करत असतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिका. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्ञान संपत्ती यांचा विनिमय समाजाच्या भल्यासाठी करा असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल
कुतूहलचे महेश गोरडे म्हणाले की, नोबेल फाउंडेशनने उभारलेली प्रयोगशाळा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या विज्ञानाच्या कार्यात प्रयोगशाळा हे कृतिशील पाऊल आहे. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासोबत प्रॅक्टिकल शिक्षण मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांनी तर सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले. आभार अमोल पवार यांनी मानले. याप्रसंगी सुधीर महाले, राजेंद्र पाटील, प्राजक्ता राजपूत, दिपक देसले, खेमचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.