जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी विष्णू धांडे यांच्या वारसांना तातडीने शासकीय देणी अदा करण्यात याव्या तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तात्काळ अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात, जळगाव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी विष्णू पुंडलिक धांडे ऑनड्युटी हृदयविकाराच्या झटक्याने मयत झालेले असून त्यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशाप्रसंगी जळगाव शहर महानगरपालिकेकडून सहानुभूतीपूर्वक मदत करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यांच्या वारसास सहानुभूती, मदत म्हणून कर्मचारी मयत झाल्यानंतरची सर्व शासकीय देणी त्वरित अदा करावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस प्रतीक्षा यादीत न ठेवता लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.