जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी कन्या आणि भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या रोहिणी खडसे यांचा झालेल्या पराभवावरून भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आता या आरोपांना आता भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. कोणाला दोष देऊन उपयोग नाही. त्यांची निवडून येण्याची क्षमता संपली होती. त्यामुळे ते पराभूत झाले. कधी म्हणता फडणवीसांमुळे पडलो, कधी म्हणता माझ्यामुळे. दोन वर्षानंतर त्यांना कळलं मी त्यांना पाडले म्हणून हे हास्यास्पदच आहे,’ असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे. नाशिक येथे भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते.
ओबीसी आरक्षणावरून टीका
‘ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झालं आहे. ठाकरे सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. अजूनही हे सरकार आरक्षणासाठी आवश्यक असं पाऊल उचलताना दिसत नाही. ठाकरे सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे ओबीसी समाजाला याचा मोठा फटका बसत आहे,’ असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
१७ ते १८ जण संपर्कात
राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलो. ही निवडणूक बिनविरोध करू, असेही ते म्हणाले. जळगावमध्ये अनेक नगरसेवक पुन्हा परत यायचं म्हणत आहेत. १७ ते १८ जण संपर्कात आहेत. मात्र, अजून विचार केलेला नाही, असा दावाही भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला.