जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील धुपेश्वर रस्त्यालगतच्या हॉटेल राजच्या हॉलमध्ये जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी रविवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत ५१ जुगारींना अटक करण्यात आली आहे.
जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना हॉटेल राजमध्ये सुरु असलेल्या जुगाराबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, सहायक पाेलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कुऱ्हा गावातील हॉटेल राजवर छापा टाकला. या वेळी ५१ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार २२० रुपये रोख, सहा चारचाकी, १० दुचाकी, ५१ मोबाइल असा एकूण ३४ लाख ५३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत अय्याज सय्यद, समाधान पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, हेमंत जांगडे, प्रकाश कोकाटे, विजय अहिरे व आरसीपीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.