जळगाव मनपा नगरसेवक अपात्र प्रकरण : उद्या जिल्हाधिकारी, आयुक्त, नगरसेवकांची सुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याच्या संदर्भात सुरू असलेल्या प्रकरणात उद्या दि. ५ ऑक्टोबर राेजी संबंधित सर्व नगरसेवकांसह महापालिका आयुक्त व जळगावचे जिल्हाधिकारी असे एकूण २९ जणांची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
जळगाव महापालिकेत भाजपकडे बहुमत असूनही २७ नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे मनपाच्या सत्तेतून भाजप पायउतार झाले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला यानिमित्ताने धक्का बसल्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजी नाशिक महापालिकेतील भाजपचे तत्कालिन गटनेते जगदीश पाटील व जळगाव महापालिकेचे भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी तीस हजार पानांचे पुरावे विभागिय आयुक्तांकडे सादर केले आहेत.
पक्षांतर बंदी कायद्यानुसार संबंधित नगरसेवकांना निवडणूक लढण्यास अपात्र करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे त्यांनी केली आहे. तीस हजार पानांचे पुरावे असल्याने सुनावणीसाठी विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले.